जामखेड प्रतिनिधी २२ ऑक्टोबर
राज्य सरकारने यंदाच्या वर्षी दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील आणि अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी घोषणा नुकतीच केली आहे. ज्यानुसार लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त १०० रुपयात रवा, चणाडाळ व साखर (प्रत्येकी एक किलो) तसेच पामतेल (१ लिटर) अशा गोष्टीचे पॅकेज स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी काही महिन्यांपूर्वीच मतदारसंघात असलेला इष्टांक संपवण्यासाठी आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२००३ अंतर्गत सर्व महसुलचे अधिकारी, प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार व ग्रामविकासच्या मदतीने लाभार्थी निवडीसाठी विशेष अभियान राबवले होते यावेळी लाभार्थी निवडीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये स्थानिक सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी देखील सहकार्य केले.
शनिवारी प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत राशीन येथे शासनाच्या 'आनंदाचा शिधा' या उपक्रमांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना किट वाटप करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यात 'आनंदाचा शिधा' याचे एकुण ७५ हजार लाभार्थी असून त्याच्या वाटपाला आता सुरुवात झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत शासनाकडून स्वस्त धान्य वितरित केले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून कर्जत व जामखेड मतदारसंघातील अनेक नागरिक पात्र असताना देखील त्यांना विविध कारणांमुळे धान्य मिळत नव्हते. परंतु मयत आणि स्थलांतरित लोकांची नावे विशेष मोहीम राबवून काढून टाकल्याने पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळाल्या आणि आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या १०० रुपये पॅकेजचा फायदा यामुळे जास्तीत जास्त कर्जत व जामखेड तालुक्यातील पात्र लाभार्थी घेऊ शकणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी विशेष मोहीम राबवली नसती तर ३३ हजार नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावं लागलं असतं.
गतवर्षी आणि या वर्षी मिळून एकत्रित ३२ हजारांहून अधिक इष्टांक आ. रोहित पवार यांनी आतापर्यंत संपवला आहे आणि पात्र लाभार्थ्यांना शिधा पत्रिका मिळवून दिल्या आहेत. तसेच एकाच वेळी २० हजारांच्या आसपास नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा उपक्रम काही महिन्यांपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात राबवण्यात आला होता. हा राज्यातील लोकप्रतिनिधींनी केलेला कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. अजूनही जे पात्र लाभार्थी या पासून वंचित आहेत त्यांना देखील शिधा पत्रिका मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
प्रतिक्रिया
सर्वच सरकारी योजनांचा फायदा हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा यासाठी अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या सर्वांना विश्वासात घेऊन आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे. तसेच या शिधापत्रिकेच्या अंतर्गत 33 हजार लोकांची नवीन नोंदणी देखील केली आहे आणि यापुढेही असेच काम करत राहू. या लाभार्थी निवडीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व ग्रामविकासची यंत्रणा, सरपंच यांनी मोलाची भूमिका बजावली.
आमदार रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा