जामखेड प्रतिनिधी ११नोव्हेंबर
यंदाच्या वर्षी राज्यात सर्वदूर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शेतकऱ्यांचा खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पिक विमा योजनेत दावे निकाली काढताना विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हीच गोष्ट ओळखून आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली आहे.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने विमा कंपन्यांनी नफेखोरी न करता लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. परंतु सर्वेक्षण पूर्ण झाले असूनही विमा कंपन्या दावे निकाली काढायला उशीर लावत असून नफेखोरीसाठी अनेक शेतकऱ्यांचे दावे देखील फेटाळले जात असल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे. अशातच पिक विमा कंपन्यांकडून अनेक तांत्रिक कारणे देखील सांगितली जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता व सरकारने भरलेला वाटा असे एकूण सुमारे 81 कोटी रुपये जमा केले असताना देखील विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ 9 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
अशी गंभीर परिस्थिती व शेतकऱ्यांना होत असलेला त्रास ओळखून आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे व पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत राज्यातील 96.61 लाख शेतकऱ्यांनी 57.63 लाख हेक्टर शेत जमिनीसाठी विमा संरक्षण घेतले आहे. यातील नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे व त्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्याच्या भेटीत सकारात्मक चर्चा देखील झाली आहे. यातून सरकार आता नेमका काय निर्णय घेणार आणि यावर कसा तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा