जामखेड प्रतिनधी-१२ डिसेंबर
पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनसक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन कर्जत व जामखेड येथे संयुक्तरीत्या करण्यात आले होते. सोमवारी जामखेड शहरातील राज लॉन्स येथे सकाळी ९:३० वाजता तर कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेत्री हेमल इंगळे यांची विशेष उपस्थिती होती. शरदचंद्रजी पवार यांचा देशाच्या विकासामध्ये गेल्या अनेक दशकांपासून सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याही वर्षी सामाजिक विकासास कारणीभूत ठरणारे उपक्रम आ. रोहित पवार यांनी आयोजित केले आहे.
महिलांना सर्वच स्तरात सक्षम बनवण्यासाठी मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. त्यातच विविध बँकांच्या सहकार्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील माता-भगिनींसाठी जनधन योजनेअंतर्गत मोफत बँक खाते उघडून देण्यासाठी दिनांक 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान उपक्रम राबविण्यात आला होता. यासोबतच महिलांच्या 2 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा पहिला हफ्ता देखील आ. रोहित पवार महिलांच्यावतीने भरणार आहेत. शिवाय या उपक्रमात एक नवा विक्रम प्रस्थापित करत तब्बल 14 हजारांहून अधिक नागरिकांना याचा फायदा झाला. यासोबतच आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातूनही 14 हजार नागरिकांना मोफत तपासणीही करून घेता आली.
सोमवारी कर्जत व जामखेड येथे संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांना सर्वच स्तरात सक्षम बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महिलांसाठी अगरबत्ती आणि समई वात बनवण्याच्या मशीनचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर महिला बचत गटांना कर्जाचे वाटप, राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षण व कवच कुंडल कार्यक्रमांतर्गत महिलांना विमा प्रमाणपत्राचे वाटप व एटीएम आणि पासबुकचे वितरण अशा प्रकारे महिलांसाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. याशिवाय महिलांना संभाजीनगरच्या विंगचुन असोसिएशनतर्फे स्व-संरक्षणार्थ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान खादी विकास योजनेअंतर्गत विविध उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ देखील आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघात नाबार्ड पाणलोट प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या प्रकल्पाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि सुरू असलेल्या पाणलोट प्रकल्पाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शनही केलं. आमदार रोहित पवार यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कायमच पुढाकार घेत मतदारसंघांतील नागरिकांना फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न केले आणि यावेळी देखील पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जन सक्षमीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना फायदा मिळवून दिला आहे. यापूर्वीही अनेकवेळा महिलांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना फायदा मिळावा याकरिता रोहित दादांनी वेळोवेळी प्रयत्न केले आणि जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या प्रशिक्षणात जिल्हयातील सर्वाधिक आकडा हा कर्जत जामखेड मतदारसंघातील आहे हे विशेष!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा