जामखेड प्रतिनिधी ७ डिसेंबर
कर्जत जामखेड मतदारसंघात रयत वॉश प्रोग्राम हा अभिनव उपक्रम राबवला जात असून याद्वारे मतदारसंघातील रयत शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, मुलींच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन आणि डीस्पोजल मशीन तसेच शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची सोय ई. कामे करण्यात येत आहेत. नुकताच पूर्ण झालेल्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा कर्जत व जामखेड दोन्ही ठिकाणी संयुक्तरीत्या आमदार रोहित पवार यांच्या हस्ते व अभिनेत्री गौरी नलावडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून वॉश उपक्रमांतर्गत कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय आणि सो.ना सोनमाळी कन्या विद्यालय तर जामखेडमधील नागेश विद्यालय आणि कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता संकुल बांधण्यात आले असून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्यावतीने कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय तर जामखेड शहरातील नागेश विद्यालय येथे स्वच्छतागृह, शुद्ध पेयजल व्यवस्था तसेच इतरही काम पूर्ण झालेल्या अद्ययावत सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा ताई पवार, अभिनेत्री गौरी नलावडे, दिग्दर्शक शंकर अर्जुन धोत्रे, क्षितीज फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल कदम-चौधरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.
या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय कायमची दूर होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे दादा पाटील महाविद्यालयात पहिल्यांदाच विद्यार्थिनींसाठी पिंक रूमची उभारणी करण्यात आली असून त्या ठिकाणी विद्यार्थिनी मासिक पाळी अथवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर विश्रांती घेऊ शकतात आणि सॅनिटरी नॅपकिन्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. अशाप्रकारे विविध उपक्रमांची सांगड घालून मतदारसंघात विविध शिबिरांच्या माध्यमातून व उपक्रमांच्या माध्यमातून आमदार रोहित दादा पवार हे हिरीरीने व विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा