जामखेड प्रतिनधी-३ फेब्रुवारी
स्वता:च्या संसारासाठी बचत गटाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचा विचार महिलांनी करावा, बचत गटाच्या माध्यमांतून तुम्हाला जो निधी मिळणार आहे, त्याच्यात बचत करून तुम्हाला तुमच्या मुलांचे चांगले शिक्षण करता येईल, त्यामुळे बचत गटाच्या चळवळीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ आणि महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमाचे 2 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे ह्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकर शिंदे, भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षा मंजुश्रीताई जोकारे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर, चोंडीच्या माजी उपसरपंच वर्षा उबाळे, संकल्प ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता मोहोळकर, स्वाती गोरे, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे, नीलम सोनवणे, कोमल कदम, वैशाली शिंदे, विद्या खरात, प्रीती देवकर सह आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
दरम्यान यावेळी चोंडी गावातील बचत गटांना तब्बल 20 लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.यामध्ये आशा महिला स्वयंसहायता समूहास दोन लाख, स्त्री शक्ती समूहास 2 लाख 60 हजार, ईश्वरी महिला बचत गटास 2 लाख, अहिल्यानगर समूहास दोन लाख, लक्ष्मी महिला समूहास तीन लाख, भाग्यलक्ष्मी समुहास दोन लाख वीस हजार, बिस्मिल्ला समूहास तीन लाख, तर रमाई समूहास दोन लाख 65 हजार असे एकुण 19 लाख 45 हजाराचे कर्जवाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, बचत गटांसाठी मनीषाताई मोहळकर ह्या भरपुर वेळ देत आहेत, त्यांना महिलांनी सहकार्य करावे. बचत गटातील सर्व महिलांनी एकजूट दाखवावी. आज तुम्ही जे भोगत आहात ते तुमच्या मुलांनी भोगू नये यासाठी महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे भावनिक अवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी पूनम मस्के, मुमताज सय्यद, मंगल रोमाडे, सुमन खरात, विद्या खरात, मीना उबाळे, भाग्यश्री कोकाटे सह आदी महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कर्ज वितरण कार्यक्रमानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे आणि आशाताई शिंदे यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून समई भेट देण्यात आली. तर मनिषा मोहळकर यांच्याकडून बकेट भेट देण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment