पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२६ मार्च
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी आठ जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. दत्तात्रय सुरेश डहाळे (वय - ३४, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता.
राहाता) आणि सुलतान फत्तेमोहमद शेख (वय - २९, रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपुर जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र व हत्यारे वापरणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिल लटके यांना दिले होते. याबाबत माहिती घेत असताना दत्तात्रय डहाळे साथिदारासह गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी बेलापूर बुद्रुक येथील बाजारतळ परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. खात्रीशीर बातमी मिळताच कटके यांनी पथकाची नेमणूक करून कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी वेशांतर करून बाजारतळ परिसरामध्ये सापळा रचला. दत्तात्रय डहाळे साथिदारासह येताना दिसताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे १ लाख ४५ हजार ७०० रुपये किंमतीचे चार गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दत्तात्रय डहाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन गंभीर गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोसई सोपान गोरे, मनोहर सिताराम गोसावी, दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, सुरेश माळी, संदिप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, पोना संदिप चव्हाण , सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, अर्जुन बडे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
No comments:
Post a Comment