पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -६ फेब्रुवारी
जामखेड शहरातील श्री विठ्ठल मंदिर येथे जगद्गुरु तुकोबाराय यांचा बीजोत्सव, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती, आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव या निमित्ताने होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची जामखेडला उत्साहात सुरुवात झाली आहे.
गेल्या ३५ वर्षापासून जामखेडचे पारमार्थिक वैभव असणारे विठ्ठल मंदिर येथे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा अर्थात बीजोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर काही वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असा हा भक्ती आणि शक्ती चा सोहळा जामखेडकर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यातच यावर्षी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्रीविठ्ठल मंदिर येथे फाल्गुन शु. ११ शुक्रवार दि. ३ मार्च ते फाल्गुन कृ. ४ शुक्रवार दि. १० मार्च या कालावधीत भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, गाथा पारायण, गाथा भजन, निष्ठावंत वारकरी ज्ञानी महापुरूषांची कीर्तने त्याचबरोबर ह. भ. प. श्री. विजय महाराज बागडे सर यांच्या वाणीतून सात दिवस संत नामदेवराय यांचे जीवन चरित्र श्रवण करण्याचा लाभ श्रोत्यांना मिळणार आहे.
शुक्रवारी जामखेडचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवने यांच्या सुश्राव्य कीर्तनाने या सप्ताहाची सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. माणिकबुवा मोरे महाराज यांचे कीर्तन झाले कीर्तनानंतर त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले याचवेळी जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची पारनेर येथे बदली झाल्यामुळे यांना निरोप देण्यात आला आहे.
रविवारपासून अनुक्रमे ह.भ.प.गणेश महाराज कार्ले, पुणे, ह.भ.प.दत्ता महाराज अंबीरकर, डिकसळ, ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नवरे, अरणगाव, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे,अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, यांची कीर्तने होतील प्रथेप्रमाणे ह.भ.प. मुकुंद (काका) जाटदेवळेकर यांचे बीजोत्सवाचे कीर्तन होईल व नंतर पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर जळगावचे ह.भ.प.भरत महाराज पाटील यांचे रात्री जागराचे. व शुक्रवारी सकाळी त्यांचेच काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर
दिलीप बाफना आणि परिवार यांच्या वतीने असणाऱ्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमासाठी आर. एन. ज्वेलर्स, ॲड. हर्षल डोके, महेश विठ्ठलराव राऊत, अभिमन्यू पवार, सुंदरदास बिरंगळ, आनंद राजगुरू, सुभाष थोरात, पोपट राळेभात या सर्व मान्यवरांनी यजमान म्हणून जबाबदारी घेतली आहे.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मधुकर राळेभात गुलाब जांभळे, सिताराम राळेभात पंढरीनाथ महाराज राजगुरू, आबासाहेब वीर, पांडूरंग भोसले, दिनकर जाधव विनायक राऊत शिवनेरी अकॅडमी चे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे व त्यांचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर गेल्या ३५ वर्षापासून शहरातील निष्ठावंत वारकरी, टाळकरी यांच्या अथक प्रयत्नातून व निष्कामसेवेतून हा उत्सव यशस्वीरित्या सुरू.
चौकट...
गुरुवार दि. ९ मार्च रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. तरी आपण या सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment