पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१ डिसेंबर
राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बावी ग्रामपंचायतवर आता भाजपने कब्जा मिळवला आहे. अविश्वास ठरावानंतर पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी बावी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आज 1 डिसेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला.
जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायत यापुर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. रोहित पवार समर्थक निलेश पवार हे बावीचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ग्रामपंचायतचा कारभार करताना सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला सदस्यांना सन्मान न देणे तसेच मनमानी कारभार करणे, या कारणामुळे सहा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच निलेश पवार यांच्याविरुद्ध 21 सप्टेंबर 2023 रोजी जामखेड तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. 26 सप्टेंबर 2023 रोजीच्या ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला होता. या राजकीय घडामोडीमुळे बावी ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीच्या सत्तेला मोठा सुरूंग लागला होता.
काल 30 नोव्हेंबर 2023 रोजी नवीन सरपंचाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. पवार यांची सरपंचपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. प्रियंका पवार यांची सरपंचपदी निवड होताच भाजपने बावी ग्रामपंचायतवर कब्जा मिळवला. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जामखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आता भाजपच्या ताब्यात येऊ लागल्या आहेत.
दरम्यान, आज 1 डिसेंबर 2023 रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी बावीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रियंका गणेश पवार व इतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बावीचे उपसरपंच दादासाहेब मंडलिक, राम पवार, दत्ता कारंडे, अशोक पवार , सचिन चिकने, अक्षय पवार, नितीन जगताप, उद्धव पवार, सुरेश कारंडे महादेव कारंडे, बालाजी शिंदे, अमृत कारंडे, रवींद्र पवार, केशव मुरूमकर, गणेश पवार, पांडुरंग उबाळे, गौतम कोल्हे, उमेश रोडे सह आदी उपस्थित होते.
चौकट
कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती आता भाजपच्या ताब्यात येत आहेत. विद्यमान आमदाराविरोधात गावागावात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे अनेक गावातील लोकप्रतिनिधी भाजपमध्ये दाखल होत आहेत. जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतवर सुध्दा भाजपने झेंडा फडकावला आहे. बावी गावच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार आहे. बावी गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा आहे.
- आमदार प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment