पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१६ जुलै
मतदारसंघातून वाहणाऱ्या सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लातूर बॅरेज टाईप मध्ये रूपांतर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात सरकारकडे केली होती. त्यास अखेर मंजुरी मिळाली असून त्यासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सीना नदीवर एकूण लघु पाटबंधारे विभागाचे १० बंधारे असून त्यातील ६ बंधारे हे आष्टी विभागात येतात तर ४ बंधारे कर्जत जामखेड मतदारसंघात येतात. मतदारसंघातील निमगाव गांगर्डा, बेलगाव, घुमरी, रातंजन, नागलवाडी, नागापूर, सितपूर, तरडगाव, निंबोडी, मलठण, दिघी, निमगाव डाकु, चौंडी इत्यादी गावे बंधाऱ्याच्या पाण्यावर शेतीसाठी अवलंबून आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर हे बंधारे दारे टाकूनही फुटून पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे ही बंधारे लातूर बॅरेज टाईपमध्ये करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली होती. जेणेकरून बंधारे फुटण्याचा धोका निर्माण होणार नाही. रोहित पवार यांनी महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन बंधारे लातूर बॅरेज टाईप मध्ये करण्यासाठी मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, तसे निवेदन त्यांनी मंत्र्यांना दिले होते.
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मार्च- एप्रिल २०२४ मध्ये बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन सदर कामासाठी ५० कोटींच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे घुमरी, रातंजन, नागलवाडी, नागापूर, सितपूर, तरडगाव या बंधाऱ्याचे कोल्हापूर बंधाऱ्यातून लातुर बॅरेज टाईप मध्ये रूपांतर होणार आहे. तसेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकु, दिघी, चौंडी या बंधाऱ्यांच्या सर्वेक्षण कामालाही मंजुरी मिळाली असुन विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ह्या कामाला अडथळा येत आहे. मात्र हे ही काम लवकरच मार्गी लावणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
बंधाऱ्यांचे लातूर बॅरेजमध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बंधारे भरल्यानंतर दारे काढणे व टाकण्याचा त्रास वाचेल, वेळेत दारे टाकल्याने बंधारे पूर्ण क्षमतेने भरतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. बंधाऱ्यांची गळती थांबेल आणि त्यामुळे वर्षभर पाणी राहील. परिणामी सिंचनक्षेत्र वाढेल.
बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून त्यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.
कोट
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंतराव पाटील साहेब यांनी बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला मंजूरी दिली व हे काम पूर्ण झाले आणि या सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचेदेखील आभार. राहिलेल्या बंधाऱ्याच्या कामालाही सरकार लवकर मंजूरी देईल ही अपेक्षा.
रोहित पवार
(आमदार -कर्जत जामखेड)
No comments:
Post a Comment