पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८ जुलै
कांदा व दुधाच्या भावासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले शेतकरी आक्रोश आंदोलन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी रात्री उशिरा दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा खा. नीलेश लंके यांनी केली.
रविवारी दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अकोले तालुक्यातील गणारे येथे याच प्रश्नावर दोघा शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण मंत्री विखे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे यांनी खा. नीलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर या खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनातून मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली होती.
रविवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मंत्री विखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विखे यांनी आंदोलनस्थळी येत लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर काही काळासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नीलेश लंके यांनी केली.
▪️चौकट
लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. जिल्हयाचे खासदार म्हणून नीलेश लंके हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यात काही चुकीचे नाही. याला राजकीय वळण देण्याची माझी भूमिका नाही. शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्यांच्या मागण्यांचा सरकार निश्चित विचार करेल. खा. लंके यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
राधाकृष्ण विखे
महसूल, दुग्धविकास तथा पालकमंत्री
▪️चौकट
आश्वासनानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित
कांद्याची निर्यात बंदी उठविल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले मात्र कायमची निर्यातबंदी उठवा अशी आमची मागणी आहे. त्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न केंद्र शासनाकडे मांडण्याची ग्वाही विखे यांनी दिली. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांना एकत्र करून कांद्याच्या निर्यातबंदीवर काही कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. दुध दरवाढीबाबत उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरविले जावेत ही आमची मागणी आहे. त्यावर कायदा करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली असून त्यासाठी त्यांनी अवधी मागितला आहे. दुधाला अनुदान न देता दुधाला ४० रूपये दर देण्याची मागणी आम्ही केली. सध्या अधिवेशन सुरू असून त्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही विखे यांनी दिली. विखे यांनी घेतलेल्या मुदतीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष काही पडल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही.
खासदार नीलेश लंके
No comments:
Post a Comment