पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१० जुलै
पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक खर्डा येथे होणाऱ्या विविध कामांना वेग मिळावा तसेच मंजूर व रखडलेली कामे त्वरित पुर्ण करावीत अशी मागणी पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांच्याकडे तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेत केली.
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून खर्डा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा सांस्कृतिक वारसा जतन करणे व पर्यटकांना आकर्षित करणेकामी तब्बल साडेसात कोटींचा निधी नव्याने मंजूर झाला. यामधून किल्ला सभोवतालच्या खंदकातील उर्वरित भिंत, बुरुज, भिंतीतील खोल्या यांची दुरुस्ती व संवर्धन होणार आहे. किल्ल्याच्या भिंतीची बाहेरील बाजू व खंदकाच्या भिंतीतील आतील बाजूच्या जोत्याचे संरक्षण करण्यासाठी दगडी फरशी बसविण्यात येणार असून इतर अनुषंगिक कामेही १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाची आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने हे काम त्वरित सुरू करण्याची मागणी गोलेकर यांनी केली.
त्याचबरोबर या किल्ल्याच्या समोर रखडलेल्या 'जनसुविधा केंद्रा'च्या बांधकामासही पुन्हा सुरुवात करण्याची मागणी केली. सुलभ इंटरनॅशनल या गैर सरकारी संस्थेकडून (NGO) या केंद्राच्या इमारतीसाठी तब्बल एक कोटी वीस लाख खर्च करण्यात येणार आहेत. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी येथे प्रसाधनगृह व उपहारगृह या माध्यमातून होत आहे. या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची पुढील ३० वर्षांची जबाबदारी याच संस्थेवर असणार आहे. याबाबत तातडीने सूचना करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन उगले यांनी यावेळी दिले.
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून 'राज्य संरक्षित स्मारक'चा दर्जा प्राप्त झालेल्या निंबाळकर गढी, छत्री व ओंकारेश्वर शिवमंदिर या वास्तूं पैकी निंबाळकर गढी व छत्रीची दुरावस्था झाली असून त्यांची सतत पडझड होते आहे. या वास्तूंचा विकास आराखडा तयार असताना सविस्तर अंदाजपत्रके संबंधित तज्ञ संस्थेने सादर न केल्याने पुढील प्रगती ठप्प असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देताच स्मारकाच्या सद्यस्थिती प्रमाणे सविस्तर अंदाजपत्रके तयार करण्यासाठी येत्या १ ते २ दिवसातच पुरातत्वच्या नाशिक विभागाचे अधिकारी, तज्ञ संस्थेचे प्रतिनिधी खर्डा येथे प्रत्यक्ष येऊन पुन्हा एकदा पाहणी व मोजणी करतील असे आश्वासन संचालक सुजितकुमार उगले यांनी दिले असल्याची माहिती विजयसिंह गोलेकर यांनी दिले.
यावेळी उपस्थित मोहन भोसले, धनंजय मोरे, सुरेश साळुंके होते.
No comments:
Post a Comment