मागील काही वर्षांपासून प्रचंड दिरंगाईने सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. राज्याच्या वित्त विभागाने 80 टक्के पद भरतीची मान्यता दिलेली असताना देखील जिल्हा परिषद बिंदू नामावली वरील आक्षेपामुळे 10% टक्के पदकपात करण्यात आली. शासनाने त्या बाबत चौकशी समिती नेमून संबंधित आक्षेपांची चौकशी होऊन त्याचा अहवाल देखील शासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर पदकपात भरती तात्काळ करण्यास कोणतीही अडचण नाही. यासंदर्भातील निवेदन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना अभियोग्यताधारक संतोष गर्जे यांनी युवा विद्यार्थी संघटनेच्या वतीने दिले.
राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. एका बाजुला जिल्हा परिषदेची अशी अवस्था असताना अनेक नपा, मनपा आणि खाजगी संस्था यांना रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी चालु शिक्षक भरती प्रक्रियेत पुरेसा अवधी दिला गेला नाही. अशा अनेक कारणांमुळे शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली दोन टप्प्यातली 50 हजाराची शिक्षक भरती पूर्ण होऊ शकली नाही. एकीकडे शाळांना शिक्षक नाहीत आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांना नोकऱ्या नाहीत हा विरोधाभास सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणवतो आहे. अनेक वर्ष शिक्षणासाठी खर्च करून भरमसाठ पदव्या घेऊन देखील शिक्षक तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. डी. एड., बी.एड., टीईटी, सीटीईटी, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी- TAIT अशा अनेक पात्रता परीक्षांमध्ये चांगले गुण घेऊन देखील शिक्षक भरती शासनाने दिलेल्या आश्वासना नुसार होत नाही तसेच शासनाचा हलगर्जीपणा व अक्षम्य दिरंगाईमुळे हजारों पात्रता धारक उमेदवारांना हक्काच्या नोकऱ्या
मिळाल्या नाहीत. या उमेदवारांची वयोमर्यादा देखील संपत चालली आहे आणि त्यांचा संयम देखील. शासनाने मोठी घोषणा करून लाडकी बहीण योजना सुरु केली. तीच उच्चशिक्षित लाडकी बहिणी आज हक्काच्या नोकरीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. भिक नको आमचा हक्क द्या, असं म्हणण्याची वेळ आज तिच्यावर आली आहे. शासनासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. विधानसभा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीची अपूर्ण राहिलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी राज्यातील हजारो शिक्षक बेरोजगार तरुण- तरुणी करत आहेत. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षक बेरोजगार उमेदवारांनी शासन दरबारी निवेदन, विनंती अर्ज करून वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. आता अखेरचा उपाय म्हणून 10 टक्के पदकपात, रिक्त अपात्र, गैरहजर, नपा/मनपा, खाजगी संस्था पदभरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याच्या
जाहिराती काढण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी म्हणून, हजारो बेरोजगार शिक्षक तरुण- तरुणी रस्त्यावर उतरले आहेत.
शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही दुसऱ्या टप्प्यासाठीची जाहिरात लवकरात लवकर काढावी अशी मागणी युवा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख व आंदोलनास उपस्थित सर्व बेरोजगार शिक्षक तरुण तरुणी यांनी शासनास दिला आहे.
No comments:
Post a Comment