पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ऑक्टोबर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज अखेर आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांच्या या यादीत सर्वांत लक्षवेधी नाव आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे.
बारामतीतूनशरद पवारांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मैदानात असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.
लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment