पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/६ डिसेंबर२०२४
खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा सावरगावतळ (ता. संगमनेर) येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मुजीब अब्दुलरब शेख (वय ५१, रा. नवीपेठ कर्जत, तत्कालीन नेमणूक हळगाव, ता. जामखेड, सध्या नेमणूक सावरगावतळ, ता. संगमनेर) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांनी मौजे हाळगाव (ता. जामखेड) येथील गट नंबर १५५ मधील एक हेक्टर १० आर व गट नंबर १५४ मधील दोन हेक्टर ३० आर क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदीखताची नोंद सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी शेख याने सुरुवातीला तीन हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदारांनी अहिल्यानगर येथे लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता. याबाबतची तक्रार ३० मे २०२४ रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान शेख याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्या संबंधित खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.
*या पथकाची कारवाई*
लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलिस नाईक चंद्रकांत काळे, अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख यांनी ही कारवाई केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा