छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मदारी मेहतर यांच्या वंशजांसाठीच्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील वसाहतीच्या बांधकामाला नाकर्ते प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशील धोरणामुळे 'घरघर' लागल्याचे पुढे आले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मुस्लिम मदारी समाजासाठीची राज्यातील पहिली वसाहत जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तब्बल दहा वर्षांपूर्वी मंजूर झाली. परंतु आजतागायत काम पूर्ण न झाल्यामुळे येथील बाजार ओट्यांवर गोधडीचे पाल टाकून राहणाऱ्या या भटक्यांचे व विशेषतः महिला व बालकांचे अतोनात हाल होत आहेत. पावसाळ्यात तर आडोसा नसल्याने तीन दगडांची चूल पेटवण्यासाठीही त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या समाजाचा पारंपारिक सापांच्या खेळासह जादूचे प्रयोग करणे हा उदरनिर्वाहाचा मार्ग पूर्णतः बंद झाला. भंगार गोळा करणे, महिलांनी गोधडी शिवणे व प्रसंगी भिक मागून हे लोक कसेतरी पोट भरतात.या वंचित समाजाच्या मागासलेपणा कडे तत्कालीन पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी सर्वप्रथम लक्ष देत प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासह त्यांच्या घरकुल योजनेसाठी १४ लाखांचा निधी मंजूर करून आणला होता. "मदारी विकास पॅटर्नच्या" शिर्षकाखाली समाजातील नागरिकांना शासकीय योजनांची लाभ देण्यात आले. तत्कालीन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा विद्यमान विधान परिषदेची सभापती मंत्री प्रा.राम शिंदे यांनी तात्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुराकरून यांच्या सहकार्यातून या समाजाच्या वीस घरांसाठी व तेथील मूलभूत सुविधांसाठी ८८ लाख दहा हजार एवढ्या रकमेला मान्यता मिळवली. ॲड.अरुण जाधव यांनी विविध प्रकारचे आंदोलने केली. त्यानंतर या वसाहतीच्या जागेच्या अदला बदलीचा खेळ येथे ग्रामपंचायतीच्या राजकारणामुळे झाला. कसे तरी काम सुरू झाले परंतु गतवर्षी पावसाळ्यात येथील अपूर्ण घरांचीही पडझड झाली. सदरचे घरकुलाचे बांधकाम लाभार्थी हे वैयक्तिक घरकुलाचे लाभार्थी असून पंतप्रधान आवास घरकुल योजना नियमाप्रमाणे करीत असल्यामुळे २०२४ मध्ये जून महिन्यात वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या पावसात पत्रा लेवल आलेले पूर्णत्वास आलेले बांधकाम पडले. घरकुलाचे पुनर्बांधणी करण्याकरिता लाभार्थी हा गरीब मदारी समाजाचा असल्यामुळे आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने घरकुल बांधकाम करता येत नाही. सदरच्या बांधकामाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापना कडून आर्थिक मदत संबंधित लाभार्थ्यांना झाल्यास घरकुल पूर्ण होण्यास मदत होईल. संबंधित घरकुल वादळामुळे पडल्यानंतर जामखेड तहसीलदार गणेश माळी व तात्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती.सापांचे खेळ करून जगणाऱ्या या भटक्या समाजाच्या वसाहतीच्या प्रश्नाचा 'खेळ' झाल्याचे दिसून येत असून कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या संबंधी लक्ष घालत वाढीव निधी ला मंजुरी देऊन या गरीब मदारी समाजाच्या घरांचे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया:
बबन बहिर ग्रामविकास अधिकारी खर्डा ग्रामपंचायत
मदारी वसाहत घरकुलाचे बांधकाम वैयक्तिक लाभार्थ्यांनी केलेले असल्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक मदत करता येत नाही. वरिष्ठ स्तरावर आर्थिक मदत मिळाल्यावर घरकुले पूर्ण होतील. ग्रामपंचायत चा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा चालू आहे.
ऍड डॉ. अरुण जाधव
प्रवक्ते ,वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य
पुढारी, अधिकारी संकटामध्ये सापडलेल्या गरीब लोकांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा करतात
No comments:
Post a Comment