राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घुले याच्यासह इतर तीन आरोपींनी देखील हत्येची कबुली दिली आहे.
वाल्मिक कराड याने सांगितल्यानंतर खंडणी मागण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. आरोपी आणि सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात सीआयडी, एसआयटीकडून तपासाला वेग आला.
अन् घुले पोपटासारखा बोलू लागला...
एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला. सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड समजला जातो. त्याने पोलीस चौकशीत हत्या प्रकरणातील सहभाग आणि सगळा घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा सुदर्शन घुले करत होता. मात्र, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढलेला व्हिडीओ पोलिसांनी दाखवताच सुदर्शन घुलेची बोबडी वळली आणि अखेर नाईलाजाने त्याने आपला गुन्हा कबूल केला. खंडणीची मागणी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचेही घुले याने सांगितले. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत.
राग आला अन्...
सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितले की, आमचा मित्र प्रतिक घुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्याचा राग मनात होता. त्याशिवाय, संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता. त्यामुळेच संतोष देशमुखाला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा