जामखेड - दि.०८ मे २०२५
समाजामध्ये अनेक सामाजिक स्थित्यंतरे होत असतांना एकल महिलांच्या प्रश्न आणि समस्यां मात्र दुर्लक्षित होत आहे.एकल महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.पतीच्या निधनानंतर, घटस्फोटानंतर किंव्हा इतर कारणांमुळे एकल झालेल्या महिलांना सामाजिक,आर्थिक आणि मानसिक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.परंतु अनेकदा त्यांना दुर्लक्षित केले जाते.अनेकदा एकल महिलांना तिरस्काराने पाहिले जाते.असा सामाजिक तिरस्कार आणि आर्थिक अस्तिरतेमुळे अनेक महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.अशा महिलांना लहान मुले असतील तर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर येते.अशा एकल महिलांच्या प्रश्न आणि समस्या निराकरण करण्यासाठी 'साऊ एकल महिला पुनर्वसन समिती' कटिबद्ध आहे.या कार्यासाठी ज्या एकल महिलांना मदत,मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनी 'स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प' कार्यालय जामखेड येथे संपर्क साधावा असे आवाहन साऊ एकल महिला समितीचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले यांनी केले आहे.
साऊ एकल महिला समिती;एकल महिलांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याने एकल महिलांचा प्रश्न लक्षात आला.एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाजाची मानसिकता बदलून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी,त्यांच्या हक्कांसाठी कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी समिती कार्यरत आहे.एकल महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून राज्यातील ८० तालुक्यात विधवा,घटस्फोटित व परित्यक्ता महिलांचे संघटन एकल महिला पुनर्वसन समितीचे प्रणेते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत.आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत या महिलांना समितीने मिळवून दिली.बालसंगोपन योजनेचा निधी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.एकल महिलांना विविध शासकीय कागदपत्रे मिळवून देणे,पेशंन मिळवून देणे,मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे,या महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणे,मालमत्ता अधिकार मिळवून देणे,मुलांच्या शिक्षणाला मदत करणे,आरोग्य शिबीरे घेणे,पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणे अशी आग्रही भूमिका घेत समिती कार्य करत आहे.समितीच्या माध्यमातून एकल महिलांना आधार देणे,त्यांच्या हक्कांसाठी लढणे,त्यांना सक्षम बनवणे या प्रमुख उद्दीष्टांवर काम केले जाते.ज्या एकल महिलांना मदतीची,मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनी ९४२०३३९९४३ या मोबाईल क्रमांकावर योगेश अब्दुले,संचिता घोगरदरे,समीक्षा अब्दुले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून एकल महिलांना मोठा आधार मिळेल आणि स्वावलंबनाची,सन्मानाची चळवळ उभी राहील अशी अपेक्षा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा