जामखेड प्रतिनधी/२मे२०२५
विश्रांतवाडी परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत पोलीस जामखेडला पोहचले. तेथून पोलिसांनी तिघा वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांच्या बुलेट, पल्सर व ज्युपिटर अशा तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
आतीक बाबा शेख (वय २२, रा. कवडगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), चांद नुरमहंमद शेख (वय २०, रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), चेतन ज्ञानेश्वर साळवे (वय १९, रा. रामगड वस्ती, कळस माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्रकाश सुभाष साबळे (वय २७, रा. माऊली निवास, विशाल परिसर, कळस, विश्रांतवाडी) यांनी २४ एप्रिल रोजी रात्री घराबाहेर बुलेट मोटारसायकल पार्क केली होती. दुसर्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता पेपर टाकण्यास जाण्यासाठी बाहेर आले असताना त्यांची बुलेट चोरीला गेल्याचे दिसून आले.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल गाडे, प्रमोद जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे मोटारसायकली चोरुन नेणारे चोर हे जामखेड भागातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी पोलीस अंमलदार बादरे, भोसले, शेख, चपटे यांचे पथक जामखेडला गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना पकडून त्यांच्याकडून विश्रांतवाडी परिसरातून चोरीला गेलेली बुलेट व बिबवेवाडी परिसरातून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, विशाल माने, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा