बीड प्रतिनधी/३०जून२०२५
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्षभर झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणातील फरार आरोपी विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी-रविवारी मध्यरात्री मांजरसुंबा परिसरातून अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिसांनी एक जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. तसेच फरारी होण्यास मदत करणाऱ्या अजय बोचरे यालाही सहआरोपी म्हणून ताब्यात घेतले गेले आहे
या अल्पवयीन विद्यार्थिनीची नीट तयारीसाठी उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्रोफेशन कोचिंग क्लासेसमध्ये विजय पवार (वय ४७) हा संचालक व प्रशांत खाटोकर (वय २८) शिक्षक, दोघांनी मिळून विद्यार्थिनीचा वर्षभर लैंगिक छळ केला होता. आरोपींनी त्या विद्यार्थिनीला बॅड टच करत तिचे नग्न फोटो काढले व मानसिक शोषण केले, अशी तक्रार विद्यार्थिनीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली. घटनास्थळी त्वरित पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला
तसेच गुन्हा नोंद झाल्यानंतर विजय पवार व प्रशांत खाटोकर फरार झाले. आरोपींच्या शोधासाठी तीन पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. फरार असलेल्या या दोघांची शनिवारी रात्री मांजरसुंबा परिसरात भेट झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विजय पवार याला लिंबागणेश परिसरातून, तर प्रशांत खाटोकर याला मध्यरात्री चौसाळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कारही जप्त करण्यात आली आहे.
दोघांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले. रविवारी (ता. २९) न्यायालयासमोर उपस्थित केल्यानंतर एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली आहे. तसेच फरारीमध्ये मदत करणाऱ्या अजय बोचरे यालाही पुण्यातून ताब्यात घेऊन सहआरोपी केले गेले आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा