अहिल्यानगर प्रतिनधी/30जून2025
राहुरी पोलिसांनी २८ जून रोजी गुप्त माहितीद्वारे अहिल्यानगर आणि सोलापूर गावांमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीसह तब्बल ७० लाख ७३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पथकाने नगर-मनमाड रोडवरील महाविद्यालयाजवळ यशस्वी सापळा रचून तीन आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (३३, सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (४२, कर्जत), आणि तात्या विश्वनाथ हजारे (४०, पाटेगाव) यांना पकडले. त्यांच्या कडून बनावट नोटा आढळल्या आणि खासगी बँकेतील अधिकारी कैलास वानी यांच्या तपासणीत त्या नकली ठरल्या
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी (सोलापूर) येथील समाधान गुरव यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना होता. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून नोटा छापणीसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक, प्रिंटर, कटिंग मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट आणि नोटा मोजण्याच्या यंत्रांसह अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. तसेच, ५, २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख, सुदाम शिरसाट आणि राजू जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यातील एका आरोपीवर यापूर्वी कुडूवाडी (जि. सोलापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो २२ महिने तुरुंगात होता. सध्या या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहेत.
या कारवाईमुळे बनावट नोटांच्या व्यापाऱ्यांवर मोठा धक्का बसला असून, तसेच पुढील तपासात आणखी काही मोठे खुलाशे होण्याची शक्यता आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा