जामखेड प्रतिनिधी –26सप्टेंबर2025
“बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे, देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे,” असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी शासनाला जाब विचारला. शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून घरे, जीवनावश्यक वस्तू तसेच हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. “माणसाबरोबर जनावरंही मरण पावली आहेत. प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीने मदत जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
आज दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या निदर्शनावेळी लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, आझाद क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव फुले, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, रेश्मा बागवान, कृष्णा मोरे, नागेश फुले, प्रवीण गायकवाड, अनिल कांबळे, योगेश फुले, संदीप सांगळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लोकाधिकार आंदोलन राज्य प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ म्हणाले, “शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शासनाने जामखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही थांबलेला नाही. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत, तर जामखेड तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला आहे. सोयाबीन, कांदा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी व गोरगरीब लोकांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यासह राज्यभर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा