खर्डा (ता. जामखेड) : येथील दैनिक लोकमतचे पत्रकार संतोष थोरात यांचे चिरंजीव शिवतेज यांनी जागतिक स्तरावरील जॉर्डन देशातून इपिक या नामांकित कपडा निर्मिती कंपनीत टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून कार्यरत राहून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कामातील चिकाटी, एकाग्रता व चाणाक्ष बुद्धीमुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव करत भारतातील भुवनेश्वर (ओडिशा) येथील शाखेत असिस्टंट मॅनेजरपदी त्यांची नियुक्ती केली आहे.
ही नियुक्तीपत्र मिळताच थोरात कुटुंबासह संपूर्ण खर्डा शहरात व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. परदेशात काम करत असताना पुन्हा भारतात नामांकित कंपनीच्या उच्च पदावर जबाबदारी मिळाल्यामुळे शिवतेज यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
शिवतेज थोरात यांनी आपले श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अभियांत्रिकी शिक्षण इचलकरंजी येथील डी. के. टी. ई. टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण केले. कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पहिल्याच प्रयत्नात ते परदेशात जाण्यासाठी निवडले गेले होते. त्यानंतर काही वर्षांत त्यांनी मेहनत, गुणवत्तापूर्ण कामगिरी व व्यवस्थापन कौशल्य सिद्ध करून ही मोठी संधी मिळवली.
या यशाबद्दल खर्डा प्रेस क्लबतर्फे शिवतेज थोरात यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने शिक्षणाच्या जोरावर परदेशात जाऊन मोठ्या पदावर यश मिळवले व आता भारतात उच्च पदावर काम करण्याची संधी मिळवली, यामुळे खर्डा व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ऊर्जा निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा