जामखेड (प्रतिनिधी):3ऑक्टोबर2025
नवरात्राचे उपवास सुरू असताना खासदार निलेशजी लंके यांनी अनवाणी पायाने जामखेड तालुक्यातील पुरग्रस्त भागांचा दौरा करून ग्रामस्थांची दुःखद अवस्था जवळून पाहिली. साधेपणा, सहज भाषाशैली आणि ठाम भूमिका यामुळे त्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या. केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांच्या अडचणी जाणून घेत, संबंधित अधिकाऱ्यांना थेट दूरध्वनीवर आदेश देण्यापर्यंत खासदार लंके यांनी तातडीची कार्यवाही केली.
लोकाभिमुख दौरा – साधेपणाची झलक*
अनवाणी पाय, साधे वस्त्र आणि ग्रामीण भाषेत संवाद साधत गावोगावी फिरताना लंके यांना पाहून लोक सहजपणे त्यांच्या आजूबाजूला जमले. “मी निलेश लंके बोलतोय, मी सांगतोय ते काम तुम्ही स्वतः या गावात येऊन करून घ्या, अन्यथा मी दोन दिवसांत परत येईल आणि मग तुम्ही आणि मी…!” अशा ठाम शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना इशारेही दिले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील असंतोष थेट व्यक्त होऊन अनेकांनी आपापल्या तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीही या दौऱ्यात आपली मते व समस्या मांडल्या.
*गावोगावी भेटी व संवाद*
खासदारांनी खर्डा, दरडवाडी पूल, माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, मोहरी तलाव, जायभायवाडी पूल, तेलंगशी रस्ता व पूल, सातेफळ, वंजारवाडी, सोनेगाव, धनेगाव, पिंपळगाव उंडा, घोडेगाव, आपटी या गावांना भेटी देऊन शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
जामखेड शहरातील प्रसिद्ध पुढारी वडाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत चहा घेताना ते हसतमुखाने चर्चा करत असल्याचे दृश्य उपस्थितांना भावले.
*खर्डा परिसरात सर्वाधिक हानी*
अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठची सुपीक शेती खरडून गेली आहे. पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून पशुधनाचेही बळी गेले आहेत. अनेक घरांत पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सरकारी पायाभूत सुविधांवरही मोठा फटका बसला असून रस्ते, पूल, वीज खांब याचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहून खासदार लंके अनेक ठिकाणी गहिवरले.
*मोहरी तलावाला भगदाड – जलपुरवठ्यावर संकट*
जामखेड तालुक्यात दुष्काळी काळात टॅंकर भरुन पाणीपुरवठा करणाऱ्या मोहरी तलावाच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे खर्ड्यासारख्या मोठ्या गावांसह परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. शेती सिंचनासाठी देखील या तलावाच्या पाण्याचा वापर परिसरातील अनेक गावातील शेतकरी करतात. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत खासदारांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
*निंबाळकर गढीचा धोका – पुरातत्त्व विभागाला तातडीचे पत्र*
ऐतिहासिक खर्डा गावातील मध्यवस्तीत असलेली पुरातन व भव्य निंबाळकर गढी अतिवृष्टीमुळे पडझडीच्या अवस्थेत आहे. या 'राज्य संरक्षित स्मारक' असलेल्या गढी भोवती दाट वस्तीसह अनेक घरे असल्याने जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. या स्थितीची पाहणी करून खासदारांनी पुरातत्त्व विभागाला तातडीने पत्र पाठवून लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले.
*दौऱ्याचा ठसा*
साधेपणाने, न घाबरता, लोकांशी थेट व प्रामाणिक संवाद साधण्याची शैली यामुळे खासदार निलेश लंके यांचा हा दौरा जामखेड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, अशी खात्री त्यांनी ग्रामस्थांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, सुरेश भोसले, चत्रभूज बोलभट, प्रा.लक्ष्मण ढेपे, खर्डा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, अशोक खटावकर, वैभव जमकावळे, गणेश ढगे, मोहरीचे उपसरपंच हनुमंत बारगजे, राजेंद्र जाधवर, अभिमान गिते, भरत ढाळे, अशोक गिते, रविराज गायकवाड, पोपटराव गायकवाड, सुहास पाटील, अमर वायकर, शंकर आवारे, ज्ञानेश्वर रंधवे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा