जामखेड प्रतिनिधी १४ ऑक्टोबर
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परिणामी कर्जत-जामखेड तालुक्यामधील पिकांचंही अतोनात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली आहे.
यासोबतच जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय पूर्ण क्षमतेने चालावं यासाठी आमदार रोहित पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबईत त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन रिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे भरण्यात यावी, तसेच शेती व पिण्यासाठी पाणी परवाना व भरीव निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी केली आहे. सोबतच मतदारसंघात वैयक्तिक शेततळ्यांचा लक्षांक वाढवून देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी तात्काळ दिले. यासोबतच जमीन नावावर नसल्याने घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसलेल्या नागरिकांच्या नावे शासकीय जमीन देण्यात यावी या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आ. रोहित पवार भेटले.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आमदार रोहित पवार यांचे कायमच प्रयत्न सुरू असतात. आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते संबंधित खात्याचे मंत्री, शासकीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा वेळोवेळी करत असतात आणि त्यातून अनेक कामे मार्गी लागली असल्याचेही पाहायला मिळाले आहे. आता शेतकरी व विद्यार्थी हितासाठी केलेल्या मागणीवर सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रतिक्रिया
मतदारसंघातील विविध विषय मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री विखे पाटील साहेब व कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेबांची भेट घेतली. तसेच जामखेड शहरामध्ये अनेक लोकांना जमीन नावावर नसल्याने घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जामखेड शहराजवळ असलेली अतिरिक्त शासकीय जमीन बेघर लोकांच्या नावे करून त्यांना घरकुलचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचीही भेट घेऊन त्यांना विनंती केली.
आमदार रोहित पवार
(कर्जत-जामखेड विधानसभा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा