जामखेड प्रतिनधी:७ ऑक्टोंबर
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कुकडी प्रकल्पा अंतर्गत येणारे माणिकडोह धरण हे गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच 90% हून अधिक भरल्याने त्याचा फायदा हा कर्जत तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, कूकडी प्रकल्पांतर्गत 5 धरणे येतात त्यापैकी माणिकडोह धरणाचा एकूण साठा हा 10.88 टीएमसी एवढा असून त्यापैकी 10.18 टीएमसी पाणी साठा हा उपयुक्त आहे. गेल्या 40 वर्षात हे धरण फक्त 3 वेळा भरलं आहे आणि यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाचा पाणी साठा हा सध्या 90 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे.
यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून आणि वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करून खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व सोयीसाठी 8 टीएमसी पाणी येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यात पाणी सुरू केलं होतं. ज्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने कधीही न भरणारी माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे ही धरणे तुडुंब भरली आहेत. दरवर्षी पेक्षा 3-4 टीएमसी पाणी यंदा धरणांमध्ये अधिक आहे.
दरवर्षी माणिकडोह धरण हे साधारणतः 60 टक्क्यांच्या दरम्यान भरते. मागच्या 2 वर्षातही तीच परिस्थिती होती. तरीसुद्धा योग्य नियोजनातून आहे त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्न केला गेला. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने कोणतीही अडचण येणार नाही.
माणिकडोह धरणाचा 90 टक्के साठा हा कुकडी डाव्या कालव्यासाठी असतो. आणि यंदा गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच 90 टक्के धारण भरल्याने त्याचा थेट फायदा हा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि दर वर्षी पेक्षा एक अधिकचे आवर्तन देखील यामुळे मिळणार आहे. आ. रोहित पवार यांच्या सुयोग्य नियोजनातून व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा शेतीसाठी पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही हे आता या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
प्रतिक्रिया -
महाविकास आघाडी सरकार असताना डिंभे ते माणिकडोह बोगद्याला मान्यता दिल्याने लवकरच त्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ते काम चालू होईल, असा विश्वास वाटतो आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
आमदार रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा