जामखेड प्रतिनिधी : १५ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील जाधव वस्तीवर दिवसा ढवळ्या मोठी चोरी झाली असून अज्ञात चोरट्याकडून
तब्बल २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून फिर्यादी शहाजी बिभीषण जाधव यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्या असून याचा प्रतिबंध कसा करावा असा नविनच प्रश्न निर्माण होत आहे.
सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील जाधव वस्ती येथे राहात असलेले शेतकरी शहाजी बिभीषण जाधव यांचे राहते घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाने तरी तोडुन घरामध्ये प्रवेश केला व घरामधील कपाटाची व सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले २,००,००० (दोन लाख रुपये) रोख रक्कम त्यामध्ये ५०० रू. दराच्या ३०० नोटा व १०० रूपये दराच्या ५०० नोटा. १५,०००/-रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुंबर, २०,००० रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे मनी व पत्ता असलेले सोन्याचे मंगळसूत्र, १०,००० मुंबई किमतीचे चार ग्रॅम वजनाचे कानातील वेल. असे २,४५,००० (दोन लाख पंचेचाळीस हजार रूपये)
किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज दिवसा ढवळ्या घरफोडी करून लबाडीचे इराद्याने चोरून नेले आहे. यानुसार फिर्यादी शहाजी बिभीषण जाधव. वय 28 वर्ष धंदा शेती रा. तेलंगशी ता. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही चोरीची घटना दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ०० वा ते दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान तेलंगशी येथील जाधव वस्ती येथे घडली आहे. घटनास्थळास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी व घटनेचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी भेट दिली आहे.
अगोदरच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी अडचणीत सापडला असताना अशा दिवसा ढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांचे नवीनच संकट शेतकऱ्यांच्या समोर उभे राहात आहे. त्यामुळे अशा चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा