जामखेड प्रतिनधी-११जानेवारी
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर १५ हजार स्क्वेअर फूटमध्ये जगातील सर्वात मोठे भव्य राजमाता जिजाऊ यांचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. चित्रकार उद्देश पघळ यांनी हे चित्र साकारले असून श्री.नागेश विद्यालयाचे कलाशिक्षक मयूर भोसले व एनसीसी कॅडेट यांनी हे चित्र तयार करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अवघ्या ४ दिवसात हे रेखाचित्र झाले पूर्ण झाले आहे.
१२ जानेवारी रोजी जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्ये देखील केली जात आहे हे विशेष. माँ साहेबांचे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे. दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी स्थानिक पदाधिकारी आणि महिलांच्या हस्ते या रेखा चित्राचे उद्घाटन पार पडणार असून त्यानंतर ते सर्वसामान्यांना बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. जामखेडमधील नागेश विद्यालय या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही कलाकुसर बघण्याचा आनंद लुटावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
संपूर्ण चित्र अवघ्या ४ दिवसात बनवून झाले असून त्यासाठी २१ ब्रास मोठी खडी, ३० गोण्या पांढरा चुना व २२ गोण्या काळा चुना वापरण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनीही या कलाकारांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत प्रोत्साहन दिले आहे. तसेच अशा पद्धतीने अनोख्या उपक्रमांना कायमच आ. रोहित पवार हे प्रोत्साहन देत असतात. अशातच आता या उपक्रमाने त्यात आणखी भर पडली आहे ज्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून येत्या काळात अशाच पद्धतीने विविध थोर पुरुषांचे सुद्धा चित्र साकारले जाणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा अशाच पद्धतीने रेखाचित्र काढले जाणार आहे.
No comments:
Post a Comment