जामखेड प्रतिनधी-८ जानेवारी
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई/शबरी आवास योजनेतून घरकुल मंजूर आहे परंतु बांधकाम सुरू केले नाही अशी सर्व घरकुले रद्द करण्यासाठी जामखेड पंचायत समितीने कंबर कसली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जामखेड तालुक्यात सन २०२१-२२ या वर्षासाठी २२२७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी २२०४ लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर असून त्यांना पहिल्या हप्त्यापोटी १५००० रु देण्यात आले आहेत. मात्र यापैकी ३५० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता देऊन सहा महिने होऊनही अद्याप घरकुल बांधकाम सुरू केलेले नाही. तसेच रमाई आवास योजनेतून सन २०२१-२२ या वर्षासाठी ४४० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी ४२१ लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर असून पहिला हप्ता घेऊनही १५० लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरू केलेले नाही. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून स्पष्ट निर्देश प्राप्त झाले असून ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याचे १५००० रु घेऊनही घरकुल बांधकाम सुरू केले नाही त्यांच्याकडून ते अनुदान वसूल करून त्यांचे घरकुल रद्द करण्याचा सूचना प्राप्त आहेत. याबाबत प्रशासन कामाला लागले असून मागील महिनाभरात जामखेड पंचायत समितीने घरकुल मंजुरी, घरकुल सुरू करणे व घरकुल पूर्ण करणे यामध्ये दमदार कामगिरी केली आहे. परंतु महिनाभर प्रयत्न करूनही, अनेकवेळा भेटूनही काही लाभार्थी प्रशासनाला कोणताही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्या गावातील पुढील लाभार्थी घरकुलपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सूचना मिळताच जमखेड पंचायत समितीने असे लाभार्थी शोधून त्यांची घरे रद्द करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
चौकट
सर्व घरकुल योजनांचे मिळून ६०० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊनही अद्याप घरकुल बांधकाम केलेले नाही. ही घरे फेब्रुवारी/मार्च २०२१ मध्ये मंजूर करण्यात आली होती. तेव्हापासून या लाभार्थ्यांना ३ नोटीस देण्यात आल्या आहेत. २ वेळा त्यांना लोक अदालत मध्येही पाचारण करण्यात आले होते. परंतु सदर लाभार्थी कोणताही प्रतिसाद देत नसून २ दिवसात घरकुल बांधकाम सुरू झाले नाही तर एकतर्फी कारवाई करून सर्व घरे रद्द करण्यात येणार आहेत. त्यांच्या जागी त्याच गावातील पुढचा क्रमांक असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येईल.
प्रकाश पोळ - गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड.
No comments:
Post a Comment