पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ फेब्रुवारी
सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली. परिणामी सरकारला विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागला. तसेच पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.
याशिवाय वेगवेगळ्या पद भरती परिक्षेतील घोळ, पदवी आणि तत्सम अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर आमदार रोहित पवार यांनी सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारसह आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. त्यामुळे रोहित पवार यांची विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच क्रेझ असल्याचेही पहायला मिळते.
त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातही त्यांनी शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा परिषदेच्या ४०० शाळा डिजिटल केल्या आहेत. तसेच आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातूनही त्यांनी मतदारसंघात शिक्षणासाठी मोठा निधी आणला. आता राज्य शासनाने त्यांची थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याने कर्जत-जामखेडपासून तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात शिक्षणावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. याबाबतचे पत्र विधानमंडळ सचिवालयाने नुकतेच त्यांना दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांचीही सिनेटवर नियुक्ती झाली आहे.
आमदार रोहित पवार यांची नुकतीच ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याने रोहित पवार यांचे राजकीय वजन वाढत चालल्याचे दिसत आहे.
चौकट
‘‘माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचा, विधानमंडळाचा आणि अध्यक्ष राहुल जी नार्वेकर यांचा आभारी आहे. अभ्यासक्रमापासून, परिक्षा शुल्क, वसतीगृह, स्कॉलरशीप, ॲडमिशन असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत माझी विद्यार्थ्यांसोबत नियमित चर्चाही होत असते. पुढील काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील.’’
-रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment