पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१८फेब्रुवारी
दि. १७ रोजी जामखेड तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या संदर्भाने ल.ना. होशिंग विद्यालयात परीक्षक कार्यालयाची बैठक नुकतीच पार पडली. इयत्ता दहावीच्या पाच व इयत्ता बारावीच्या सहा केंद्रावर या परीक्षा होत आहेत.इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्चपासून व इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने या संदर्भातील नियोजना साठी ही बैठक नियोजित केली होती.
यावेळी बोलताना प्रकाश पोळ यांनी सांगितले की इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे, पालक व समाज घटकांचे या परीक्षेकडे बारकाईने लक्ष असते. चालू वर्षाच्या या परीक्षेसाठी जामखेड तालुक्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुका पातळीवर भरारी पथके, बैठे पथकांची निर्मिती करून तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात येतील. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी परीक्षक कार्यालय ते मुख्य परीक्षा केंद्र पर्यंत नेमण्यात आलेल्या सहाय्यक परीक्षक यांना जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परीक्षा केंद्रावर हुल्लडबाजी तसेच अनैतिक प्रकार करणाऱ्यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. तालुक्यातील सर्व शिक्षणप्रेमीनी व समाज घटकांनी आपल्या पाल्याच्या उन्नतीसाठी कॉपीमुक्त अभियानात सहभागी होऊन प्रशासन व परीक्षा मंडळास सहकार्य करावे असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात इयत्ता दहावीच्या ५ व इयत्ता बारावीच्या ६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे. जामखेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड या सभेसाठी उपस्थित होते.या दोन्हीही परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेसाठी सर्व केंद्राचे केंद्र संचालक ,तालुक्याचे परीक्षक श्री सुरेश कुंभार, ल.ना.होशींग विद्यालयाचे प्राचार्य श्री.श्रीकांत होशिंग यावेळी उपस्थित होते. सभेच्या शेवटी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. कैलास खैरे यांनी या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देऊन अचूक कार्यवाहीच्या सूचना देवून, सर्व उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment