महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत स्पर्धेची परंपरा जोपासण्यासाठी व पुढे नेण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील सर्वात भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी केंद्रीय मंत्री, खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची देखील विशेष उपस्थिती होती. यासह अनेक आमदार, नेते व दिग्गज मंडळी या बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित होते.
सोमवार रात्रीपासूनच राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी शर्यतप्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी नोंदणी सुरू झाली आणि त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. अवघ्या राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. राज्यभरातील तब्बल २६४ बैलगाडी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवसभर स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच अत्यंत अटीतटीची लढत स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळाली.
गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल तसेच आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचं आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.
अशा या रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यात हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांना यश आलं असून द्वितीय क्रमांकावर राजू शेठ मासाळ लोणंद यांनी आपलं नाव कोरलं आहे व तृतीय पारितोषिक अंश उत्तम गवळी बदलापूर यांना मिळाले. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत स्पर्धेचा थरार कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर पाहायला मिळाला. एकूण ३५ गट सकाळपासून संध्याकाळपर्यंत या शर्यतीत पळविण्यात आले.
महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील विजेत्यांना २ गटात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये अंतिम स्पर्धा आणि द्वितीय स्पर्धा अशी विभागणी करण्यात आली होती दोन्ही विभागात प्रत्येकी ७ असे १४ बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलगाडी मालकाला २ लाख २२ हजार २२२ रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा तर द्वितीय आणि तृतीय आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे १ लाख ११ हजार १११ रुपये आणि ७७ हजार ७७७ रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच द्वितीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ५१ हजार १११, ४१ हजार १११ आणि ३१ हजार १११ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा