जामखेड प्रतिनधी -२० फेब्रुवारी
कर्जत-जामखेड मतदारसंघात ‘एमआयडीसी’ मंजूर करुन आणल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्षात उद्योग सुरु करण्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी प्रमुख उद्योगपतींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरु केल्या आहेत.
दुष्काळी आणि मागास मतदारसंघात गणना होत असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये अनेक वर्षांनी प्रथमच राजकीय बदल झाला आणि रोहित पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला. या निवडणुकीपासूनच या मतदारसंघातील रोजगाराचा विषय ऐरणीवर होता. प्रचारादरम्यान या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ आणण्याचा शब्द रोहित पवार यांनी दिला होता आणि निवडून आल्यानंतर अवघ्या दिड वर्षांत दिलेल्या शब्दाची त्यांनी पूर्तता केली. महाविकास आघाडी सरकारने या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ मंजूर केली. आता हा विषय अंतिम टप्प्यात असून तो तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार रोहित पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले आहे. शिवाय या ‘एमआयडीसी’त उद्योग आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी केली असता त्यालाही उद्योगमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.
यावरच समाधान न मानता स्वतः रोहित पवार यांनीही त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आज त्यांनी TPCL, जिंदाल, एशियन पेंटस् या कंपन्यांच्या मालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
पॅकेजिंग उद्योगात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी देशातील आघाडीची कंपनी म्हणून TPCL कंपनी ओळखली जाते. विविध प्रकारची खाद्यान्न, पेये तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फार्मास्युटिकल आदी आघाडीच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगचे काम या कंपनीकडून केले जाते. पेपरबोर्ड पॅकेजिंग उद्योगातील एक मोठे नाव असणारी ही कंपनी असून या कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक साकेत कनोरीया यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
जिंदाल स्टील ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची खासगी पोलाद उत्पादक कंपनी आणि रेल्वेचे उत्पादन करणारी देशातील एकमेव खासगी कंपनी आहे. जागतिक पातळीवर या कंपनीचा मोठा विस्तार आहे. ही कंपनी विविध अवजड आणि उद्योगात लागणारे स्टील बनवते. या कंपनीचे मालक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांचीही आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग सुरु करण्याबाबत त्यांच्याशी सकारात्मक आणि सविस्तर चर्चा केली. याशिवाय मुंबईत मुख्यालय असलेली एशियन पेन्टस् लि. ही बहुराष्ट्रीय पेंटस् कंपनी आहे. पेंट्स, कोटिंग्ज, होम डेकोरशी संबंधित उत्पादने, बाथ फिडिंग्ज आणि संबंधित सेवा-उत्पादन-विक्री क्षेत्रातील ही एक बलाढ्य कंपनी समजली जाते. या कंपनीशी सबंधित अमित चोक्सी यांच्याशीही कर्जत-जामखेडच्या ‘एमआयडीसी’त त्यांचे उत्पादन सुरु करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी चर्चा केली आहे. अमित चोक्सी यांनी त्यांच्या मित्रासोबत ही कंपनी सुरु केली होती आणि ते स्वतः केमिकल उद्योगाशीही संबंधित आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या ‘एमआयडीसी’त विविध कंपन्या सुरु व्हाव्यात आणि येथील विकासाला चालना मिळण्यासोबतच या भागातील युवक-युवतींना रोजगार मिळावा, यासाठी रोहित पवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसते.
-------------------------..
चौकट
माझ्या मतदारसंघात ‘एमआयडीसी’ आणण्याचा शब्द मी दिला होता, तो पूर्ण केला. आता विविध उद्योजकांशी बोलणी करुन त्यांना लागणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा, मनुष्यबळ याबाबत चर्चा करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी देशभरातील अनेक उद्योजकांशी माझी यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरु आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांचंही याबाबत व्यक्तीशः लक्ष आहे. शिवाय राज्य सरकारकडूनही याबाबत सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास करणं आणि येथील युवांच्या हाताला काम देणं हे माझं उद्दिष्ट असून त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत.’’
- रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment