पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२० मार्च
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अशातच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'स्वयंसिद्धा चला महिला उद्योजक घडवूयात' या उपक्रमांतर्गत जामखेड शहरात कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि महाराष्ट्र बँकेच्या सहकार्याने महिला बचत गटांना कर्जवाटप व अगरबत्ती आणि सिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मतदारसंघातील महिलांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी वेळोवेळी अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. जामखेड शहरातील राज लॉन्स येथे पार पडलेल्या सोहळ्यात ९७ महिला बचत गटांना व्यवसायासाठी २ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्जवाटप तसेच २० महिला बचत गटांना अगरबत्ती आणि समई वात बनवण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच याप्रसंगी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या बचत गटांना बँकेचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे देखील वाटप करून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उपस्थित असलेल्या ११०० महिला भगिनींना संबोधित केलळीयावेळी बोलत असताना त्यांनी समाजातील स्त्री आर्थिक व सामाजिक सक्षम झाली तर समाजपरिवर्तन व्हायला वेळ लागत नाही.जबाबदार समाज म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांना सर्व स्तरावर अधिकार आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले. तसेच मतदारसंघातील महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील असा विश्वासही व्यक्त केला. यापूर्वी देखील अशा पद्धतीने मतदारसंघात महिलांसाठी आर्थिक सहाय्यता कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक मदत, विविध प्रकारची महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शनपर शिबिरे तसेच महिला बचत गटांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे अशा पद्धतीचे उपक्रम आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले आहेत.
यामुळे बचत गटांतील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास निश्चितच मदत होत असून त्यांना लोकप्रतिनिधीकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. असे अनेक उपक्रम मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत ज्यांची एकत्रित किंमत १० कोटींहून अधिक आहे.
No comments:
Post a Comment