पोलीस वारंट न्युज नेटवर्क - ९ जून
जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या पिडीत विद्यार्थ्यीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. आता पोलीस प्रशासनाने मोरेला अटक करावी अशी मागणी होत आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्था चालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतर मोरेच्या काॅलेजवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशपुर्व प्रवेशासाठीची स्पर्धा परिक्षेचे कारण दाखवत श्रीगोंदा सत्र न्यायालयापुढे तात्पुरत्या जामीन साठी अर्ज दाखल केला व त्यास तात्पुरता जामीन मिळालाही. यामुळे काही काळ का होईना पण जामखेड पोलीसांबाबत या प्रकरणी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. मात्र यानंतर जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच आवश्यक योग्य कार्यवाहीमुळे भास्कर मोरेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला असून मोरे फरार झाला आहे.
दरम्यान डॉ. भास्कर मोरेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मुलीला योग्य ते सहकार्य करत खर्डा चौकात तिव्र निदर्शने व अंदोलने व जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मुलीने दाखल केलेल्या विनयभंग गुन्हा प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच काॅलेज मधील मुलामुलींची विविध पध्दतीने केलेली पिळवणूक व शासनाची दिशाभूल करून विविध शाखांना मिळविलेल्या परवानग्यांसह संस्थेत चालणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करून डॉ. मोरे विरूद्ध कठोर कारवाई करावी यासाठी आज दि. २३ मे रोजी जामखेड येथिल खर्डा चौक येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
तर आज दि. २९ रोजी वंचीत बहुजन आघाडीचे आतिश पारवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाचे अंदोलन करण्यात आले.
डाॅ. भास्कर मोरे विरूद्ध दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत असून पोलीस नाईक अजय साठे हे त्यांना सहकार्य करत आहेत.
उच्च न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत दहा गंभीर मुद्दयावर दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र मोरेच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे फेटाळत सरकारी पक्षाची बाजू योग्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले. व त्या अधारे भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यानुसार आता मोरेला अटक करण्याची मोठी जबाबदारी जामखेड पोलीसांवर आली आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व या गुन्हाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्याशी संपर्क केला असता भास्कर मोरेला अटक करण्यासाठी जामखेड पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच मोरेवर आणखी कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य तो तपास करत असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले..
No comments:
Post a Comment