पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२७ ऑक्टोबर
बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेलेले आणि संघर्षशील नेता असा परिचय असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.
ढाकणे हे न्युमोनिया या आजाराने ग्रस्त होते. गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. यातच त्यांची प्रकृती खालावली. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी दिली.
वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ रोजी अकोला येथे झाला. विद्यार्थी दशेत असतानाच थेट दिल्ली गाठून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये त्यांनी भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन. त्यानंतर गोवा मुक्ती सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा होता. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पाथर्डी तालुक्यातील विकासासाठी विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली आठवण आजही आवर्जून सांगितली जाते.
बबनराव ढाकणे हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध प्रश्न त्यांनी तडीस नेले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला.
ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एकपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा