पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ फेब्रुवारी
इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाताही झाला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी द्वारका लॉन्स, नेप्ती, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केले.
दरम्यान नगर जिल्ह्यातील अकरा हजार कोटींची रस्ते विकास कामे प्रगतीपथावर असून 2024 अखेर अमेरिकेच्या तोडीचे रस्ते नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे होतील, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरबाहेरून जाणारा रस्ता तसेच नगर-करमाळा रस्त्याच्या दोन टप्प्यांचे मिळून सुमारे 3000 कोटींच्या कामांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. कल्याण रोडवरील द्वारका कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास खासदार डॉ. सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रा. भानदास बेरड, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आदींसह इतर मान्यवर मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी यांनी देशभरात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कार्यक्रमांची माहिती दिली. सुरत ते चेन्नई महामार्ग नगर जिल्ह्यातून जात असून या रस्त्याच्या नगर जिल्ह्यातील 141 किलोमीटर कामासाठी 11000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय पुणे-संभाजीनगर महामार्गावर पुण्यापासून शिरूर पर्यंत उड्डाणपूल असेल व तेथून 40 मिनिटात नगर गाठता येईल. जिल्ह्याचे हे दोन रस्ते महाराष्ट्राची लाईफ लाईन ठरणार आहेत, असे स्पष्ट करून गडकरी म्हणाले, इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता तर आहेच; परंतु आता ऊर्जादाताही झाला आहे. पंजाबात तणस पासून डांबर तयार केले जात आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यामुळे समृद्धी लाभलेल्या नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी आता ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यायला हवे. भविष्यात हीच टेक्नॉलॉजी असणार आहे. बायोमास पासून मिथेन तयार केल्यावर त्यातून हायड्रोजन निर्मिती करता येते. हायड्रोजन वर कारखाने, रेल्वे इंजिन, ट्रक, बसेस, विमानेही चालू शकतात. त्यामुळे ऊर्जा आयात करणारा आपला देश आता ऊर्जा निर्यात करणारा होणार आहे, असा दावाही गडकरी यांनी केला.
नगर जिल्ह्यात 12000 कोटींची 21 रस्त्यांची कामे मंजूर केली होती. त्यापैकी 11 कामे पूर्ण झाली आहेत व नऊ कामे प्रगतीपथावर आहेत असे स्पष्ट करून गडकरी म्हणाले, सुरत ते चेन्नई नगर मार्गे रस्ता हा स्वतंत्र 11000 कोटींचा आहे. जिल्ह्याचे चित्र यामुळे बदलत आहे. जिल्ह्यात आता नवीन कामे माळशेज व आणे घाटाचा 400 कोटींचा रस्ता, अहमदनगर- सबलखेड- आष्टी 670 कोटीचा रस्ता, नांदूर शिंगोट ते कोल्हार हा 350 किलोमीटरचा रस्ता होत आहे. नगर ते शिर्डी या 75 किलोमीटरच्या कामास अनेक अडचणी आल्या. जुना ठेकेदार बदलून नवीन ठेकेदार दिला आहे. पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती केली जात आहे व 677 कोटीची या रस्त्याची निविदा मंजूर आहे. आतापर्यंत दहा टक्के काम झाले आहे व लवकरच या रस्त्याचे कामही पूर्ण होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
तसेच तसेच खासदार विखेंच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्गी लागणाऱ्या विविध विकासकामांचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले. याबद्दल खासदार विखेंनी देखील त्यांचे आभार मानून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि विकासकामांची माहिती नितीन गडकरी यांना या कार्यक्रमाच्या दरम्यान दिली.
--
चौकट
तर मी काही देऊ शकलो नसतो - खा. सुजय विखे
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंत्री गडकरी यांचे विशेष आभार मानले. माझ्या खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळात नितीनजी गडकरी रस्ते विकास मंत्री नसते तर मी जिल्ह्याला काहीही देऊ शकलो नसतो, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच गडकरी यांनी जिल्ह्यासाठी दिलेले योगदान पुढील चाळीस वर्षे जिल्ह्याची युवा पिढी विसरू शकणार नाही. या कामामुळे जिल्ह्याचे युवक भविष्याची उज्जवल स्वप्ने पाहत आहेत व भविष्यातही नगर जिल्ह्याचा अविरत विकास चालू राहील, असा विश्वासही खासदार विखे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment