जामखेड प्रतिनधी/२६ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील एका ग्रामसेवकाने जिवंत व्यक्तीला मयत दाखवल्याच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाविरोधात गेल्या तीन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर
उपोषण सुरू होते. अखेर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोषी ग्रामसेवक राजेंद्र वळेकर यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.यामुळे तिसऱ्या दिवशी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी आपले उपोषण मागे घेतले.
राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साकत, नान्नज, जायभायवाडी तालुका जामखेड येथे कार्यरत असुन निलंबन आदेशानुसार, राजेंद्र वळेकर यांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा दाखवला आणि कर्तव्यात कसूर केली. त्यांना सुधारणेची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चा भंग झाला आहे.
निलंबन काळात वळेकर यांचे मुख्यालय पंचायत समिती श्रीगोंदा येथे राहील. त्यांना गटविकास अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. या काळात त्यांना खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमानुसार त्यांना निलंबन भत्ता आणि पुरक भत्ते दिले जातील.या कारवाईमुळे लाभार्थ्याचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मात्र, या प्रकरणाने संपूर्ण जामखेड परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा