खर्डा प्रतिनधी/28एप्रिल2025
सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना पिकअपने टक्कर मारल्याने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे हृदयद्रावक अपघात घडला. रविवार, २७ तारखेला पहाटे खर्डा-भूम रोडवर घडलेल्या या अपघातात स्मिता दिलीप रणभोर या महिलेचा मृत्यू झाला असून वर्षा प्रकाश दिंडोरे गंभीर जखमी आहेत. घटनानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकाला मिरजगाव येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की खर्डा भूम रोडवर स्मिता रणभोर आणि वर्षा दिंडोरे या दोघी सकाळी फिरण्यासाठी चालत होत्या. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या MH-14-MH 0135 नंबरच्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. धडकीच्या जोरामुळे स्मिता रणभोर जागीच ठार झाल्या, तर वर्षा दिंडोरे रस्त्याच्या कडेला पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघात झाल्यानंतर पिकअप चालक जामखेडमार्गे पळून गेला होता. खर्डा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडीचा नंबर ओळखून चालकाचा शोध लावला. मिरजगाव येथून त्याला गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
कै. स्मिता रणभोर या खर्डा येथे टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या कष्टाळू महिला म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. घटनेची बातमी पसरताच शहरभर शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा