अहिल्यानगर प्रतिनधी 11,मे2025
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा पट्टा आता वाजणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गती मिळणार आहे. या आदेशानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुका २५९ ते २८७ नगरसेवकांच्या जागांसाठी होऊ शकतात, परंतु सदस्यसंख्येतील वाढीची स्पष्टता अद्याप नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या ११ नगरपालिका आणि ४ नगरपंचायती आहेत. यामध्ये संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा आणि शिर्डी या ११ नगरपालिका आहेत. शिर्डीला दोन-अडीच वर्षांपूर्वी नगरपंचायतीवरून नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. तर अकोले, पारनेर, कर्जत आणि नेवासा खुर्द या चार नगरपंचायती आहेत. यापैकी अकोले, पारनेर आणि कर्जत या नगरपंचायतींचा कालावधी २०२७ मध्ये संपणार असल्याने, सध्यातरी ११ नगरपालिका आणि नेवासा खुर्द या एका नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. सध्या या १२ संस्थांवर प्रशासक नियुक्त असून, निवडणुका न झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींची कमतरता जाणवत आहे.
२०२१-२२ मध्ये संगमनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, देवळाली प्रवरा आणि जामखेड या नऊ नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत सरासरी दोन ते तीन सदस्यांची वाढ करण्यात आली होती. या कालावधीत या नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला होता, परंतु तो रद्द करण्यात आला. आता ही वाढीव सदस्यसंख्या मान्य होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. जर वाढीव संख्या मान्य झाली, तर २८७ जागांसाठी निवडणुका होतील; अन्यथा जुन्या २५९ जागांनुसारच निवडणुका घ्याव्या लागतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या हाती असलेल्या या संस्थांमध्ये आता लोकनियुक्त प्रतिनिधी निवडले जाणार असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रभागनिहाय मतदारसंघांचा अभ्यास, उमेदवारांची चाचपणी आणि प्रचाराची रणनीती आखण्याचे काम जोमाने सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा