अहिल्यानगर प्रतिनिधी/१० जून २०२५
अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. ही घटना मंगळवारी (ता.10) रोजी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात 7 ऑक्टोबर 2021 रोजी दहशत करून गोळीबार केला होता. या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रकरण नेमकं काय?
पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याचा गुन्हा आरोपीवर आहे. आरोपी सुनील लोखंडेने पोलीस उपअधीक्षक संदीप मेटके यांच्यावर गोळीबार केला होता. घटनेनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी तो कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु सहा दिवसांपूर्वी लोखंडेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याने संधी साधत बंदोबस्तावर असलेल्या गार्डची नजर चुकवली अन् रूग्णालयातून धूम ठोकली. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील या घटनेने धाबे दणाणले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वीचअहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना घडली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा