जामखेड प्रतिनिधी/5 जुलै2025
कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावातील वृद्ध महिलेला सोन्याच्या बिस्कीटाचे स्वप्न दाखवून मोठी फसवणूक केली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कालांतराने, कर्जत पोलीसांनी या फसवणुकीच्या मुख्य आरोपींना जामखेडमध्ये विशेष सापळा लावून अटक केली आहे. ही फसवणूक १६ जून रोजी घडली होती, जेव्हा काही अनोळखी व्यक्तींनी वृद्धेचं सोनं घेऊन त्याऐवजी सोन्यासारखे बिस्कीट देण्याचा दावा केला. या लोकांनी वृद्ध महिलेला तिच्या सोन्याचे मणक्याचे दागिने, पोत आणि रोख रक्कम घेतली, पण त्याऐवजी बनावट सोन्याचे बिस्कीट दिले व पळून गेले
पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी रमीझ मुलानी यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि वृद्ध महिलेची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार कर्जत व जामखेड परिसरात आरोपींच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून शोध पथकाने आरोपींचा सापळा रचून चार आरोपींना जामखेड येथे अटक केली आहे. आरोपींचे नावे अभिमान बाबु तुपे (वय ४८) विकी अभिमान तुपे (वय २७) (दोघे रा.पिठी निरगुडी, ता. पाटोदा, जि.बीड), विकास विजय जाधव (वय २८ रा. धस पिंपळगाव ता. पाटोदा जि. बीड), दत्ता अर्जुन जोरे (रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार जि. बीड) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.
या फसवणुकीतून हस्तगत सोन्याचे दागिने १५ ग्रॅम, रोख २५ हजार रुपये आणि सहा लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातून कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले
यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सपोनी रमिझ मुलानी, यांनी या घटनेचा तपास लावला. या तपास पथकात पोहेकाँ प्रवीण अंधारे, मनेष शिंदे, प्रताप देवकाते, किरण बोराडे, प्रकाश दंडाडे, किरण जाधव, नितीन धस, लहु घोलवाड, जामखेड पोलीस स्टेशनचे प्रकाश मांडगे, कुलदीप घोळवे, नितीन शिंदे, ज्योती काळे यांचा समावेश होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा