जामखेड प्रतिनिधी – 16ऑगस्ट2025
सारोळा गावचे भूमिपुत्र व माजी जामखेड तालुकाध्यक्ष ॲड. अजय (दादा) काशिद यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर येथे निवडीचे पत्र प्रदान केले.
पक्षातील युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हा चिटणीस आणि तालुकाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडलेल्या काशिद यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कठीण परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहून मोर्चाबांधणी करण्याचे काम त्यांनी केले होते.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. नागपंचमी निमित्त श्रीनागेश्वर यात्रेत भव्य कुस्त्यांचे आयोजन, गावच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या सारोळा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमांचे कौतुक असे त्यांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत.
विशेष म्हणजे, जलसंधारणाच्या कामातून आणि श्रमदानातून गावातील नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले असून, याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
गावगाड्याच्या राजकारणातही त्यांनी पत्नी रितू अजय काशिद यांना सरपंच पदावर रुजू करून यशस्वी कारकीर्द घडवली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा