जामखेड प्रतिनधी/18 ऑगस्ट2025
जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवरील शिऊर फाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या एका हत्येची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सारोळा येथील जोतिराम शामराव काशीद (वय 36) हे रात्री जेवणासाठी शिऊर फाटा येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवणानंतर हॉटेलमधील कामगार दिपक गुलाबराव सातपुते (रा. मनमाड, जि. नाशिक) याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाच्या रागातून सातपुते याने लाकडी काठीने काशीद यांच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या काशीद यांचा मृत्यू झाला.
घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी लक्ष्मण शामराव काशीद (वय 30, व्यवसाय-शेती) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे.
पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा