जामखेड प्रतिनधी/31ऑगस्ट2025
लोणंद येथील एसटी स्थानकावर व्यापारी विनोद सुंदरदास चावला यांच्या पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड चोरीची घटना दि.२६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी रोकड लंपास केली. पोलिसांनी तात्काळ चौकशी करून तीन दिवसांतच तिघी संशयित महिलांना लोणंद येथील इंदिरानगर भागातून अटक केली असून चोरीची रोकड जप्त केली आहे.
घटनेनंतर विनोद चावला यांनी त्वरित लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपासाला वेग दिला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे हे गुन्हे जामखेड तालुक्यातील तीन महिलांनी घडविल्याचे उघडकीस आले. संशयितांमध्ये चिलकारू उमेश पवार (वय 30, मूळ रा. जामखेड), सविता राजू पवार (वय 40, रा. आरोळी वस्ती, जामखेड) व अंजली राकेश पवार (वय 35, मूळ रा. मिलिंदनगर, जामखेड) अशांचा समावेश आहे.
त्यांच्या ताब्यातून ५० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे, ज्योती चवाण, सहाय्यक फौजदार पिसाळ, अंकुश कोळेकर आणि अमोल जाधव यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विनोद चावला हे लोणंद येथील व्यापाऱ्यांकडून मालाचे पैसे गोळा करून नीरा येथे जाण्याच्या उद्देशाने एसटी स्थानकात आले होते. बसमध्ये चढण्याच्या वेळी गर्दीत हात जोडून रखडीतल्या चोरट्यांनी त्यांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि काटेकोरपणे तपास करून आरोपींना अटक केले असून, चोरीची रोकड आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा