जामखेड प्रतिनिधी/25ऑगस्ट2025
नान्नज (ता. जामखेड) येथे दहशतीच्या भाषा करणाऱ्या टोळक्याने गावात दहशत माजवत गाडीच्या काचा फोडून तलवार, कोयते, लोखंडी गज व काठ्यांनी सात जणांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी 14 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 24 ऑगस्ट) संध्याकाळी अभिजीत संपत साळवे यास त्याचा भाऊ यशदिप साळवे याने फोन करून नान्नज बाजारतळावर झालेल्या मारहाणीची माहिती दिली. यावेळी यशदिप गंभीर जखमी असल्याने त्यास प्रथम जामखेड येथील रूग्णालयात दाखल केले, मात्र स्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.
दरम्यान, फिर्यादी अभिजित साळवे नातेवाईकांसह गाडीने नगरकडे निघाल्याने गावाजवळ आरोपींनी त्यांची वाट अडवून गाडीच्या काचा फोडल्या तसेच तलवार, कोयते व लोखंडी गजांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.
या हल्ल्यात अभिजित संपत साळवे, यशदिप साळवे, आदर्श सुनील साळवे, दिग्विजय सोनवणे, गाडीचालक सद्दाम पठाण, रतन साळवे व रेशमा साळवे अशी सात जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
हल्ल्यावेळी आरोपींनी, “तुम्ही दहशत संपवता म्हणता, पण आम्हीच तुम्हाला ठार करू” असे म्हणत गावकऱ्यांना जीवघेणी धमकी दिली. तसेच सुमारे 27 हजार रुपये रोख, मोबाईल व गाडीच्या किल्ल्या लुटल्या.
या प्रकरणी वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय भोसले, ओम गोरे, विजय साबळे, साईनाथ रजपूत, नरेंद्र सोनवणे, कल्याण मोहळकर, सोमनाथ शिंगटे (रा. नान्नज), निलेश माने, किरण जगदाळे (रा. महारूळी), हर्षद काकडे (रा. बोर्ले) तसेच दोन अनोळखी अशा 14 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. एका आरोपीस अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी तिन्ही विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा