जामखेड प्रतिनिधी/१ऑक्टोबर२०२५
जामखेड – विंचरणा नदीलगत अमरधाम ते भुतवडा रोड परिसरातील व्यसनाधीन व रोडरोमींचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भिमटोला सामाजिक संघटनेतर्फे देण्यात आला. बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी संघटनेचे नेते बापूसाहेब गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.तपनेश्वर येथील अमरधाम रोड ते भुतवडा रोड हा रस्ता विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून, येथे रोडरोमी व व्यसनाधीन तरुण टोळके गैरवर्तन, महिलांची छेडछाड, अश्लील हातवारे तसेच शेतात घुसून नुकसान करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्यालगत दारूच्या बाटल्यांचा खच दिसून येत असून संपूर्ण परिसर असुरक्षित व अस्वस्थ करणारा झाल्याचे नमूद करण्यात आले.सायंकाळी सहा वाजल्यानंतर तर दिवसा देखील महिला व विद्यार्थिनी निर्भयपणे या मार्गावर जाऊ शकत नाहीत, एवढी दहशत या टोळक्यामुळे पसरली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या भागात शांततामय व सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बापूसाहेब गायकवाड यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा